पुणे : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२०२७ च्या गळीत हंगामाची पूर्वतयारी चालू आहे. या हंगामासाठी कारखान्याकडे कार्यक्षेत्रात सुमारे १८, ००० एकर क्षेत्रावरील उसाची नोंद झाली आहे. कार्यक्षेत्राबाहेरील उसाच्या नोंदी घेतल्या जात आहेत. यंदा उस उपलब्धतेचा अंदाज विचारात घेऊन १२ लाख मे. टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली ऊसतोड वाहतूक यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी करार केलेल्या मुकादमांना पहिल्या हप्त्याच्या धनादेशाचे वाटप मंगळवारी (दि. २३) करण्यात आले. मागील हंगामातील ऊसतोडणी वाहतुकीची बिले, कमिशन व डिपॉझिट, इत्यादींचे पेमेंट ऊसतोड वाहतूक मुकादमांना यापूर्वीच वेळेत अदा केले आहे. त्याबद्दल ऊसतोड वाहतूक मुकादमांनी संचालक मंडळाचे आभार मानले.
कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास गावडे यांच्या हस्ते, संचालक मंडळाच्या उपस्थितीत हे वाटप पार पडले. जिल्ह्यात सर्वप्रथम हार्वेस्टिंग अॅडव्हान्सच्या पहिल्या हप्त्याचे वाटप श्री छत्रपती कारखान्याने केले आहे. यंदा प्रतिदिन ८,००० मे. टन व त्यापेक्षा जास्त ऊस गाळप करण्याचे नियोजन आहे. जास्तीत जास्त गाळप होण्यासाठी एक चांगली योजना संचालक मंडळ तयार करीत आहे. कारखान्याचे सभासद व बिगरसभासद यांनी पिकवलेला व कारखान्याकडे नोंदवलेला सर्व ऊस श्री छत्रपती कारखान्यास गळितास देऊन सहकार्य करावे. तसेच ऊसतोड वाहतूक मुकादमांनी हंगामात करारातील सर्व वाहने व ऊसतोड मजूर कामावर हजर करून कारखान्यास पूर्ण क्षमतेने दैनंदिन उसाचा पुरवठा करावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केले.
यावेळी कारखान्याचे संचालक, अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, जनरल मॅनेजर हनुमंत करवर, मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे तसेच बहुसंख्य मुकादम उपस्थित होते.


















