कोल्हापूर : गळीत हंगाम सुरू होण्याआधी ऊस वाहतूकदारांकडून ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी करार केले जातात. यासाठी कागदपत्रे ऊस वाहतूकदारांकडून कारखाना प्रशासन जमा करून घेतली जातात. याच कागदपत्रांचा आधार घेत राज्यातील सुमारे १५० खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी मुद्रा कर्ज योजनेची उचल केली आहे. या प्रकरणात अनेक नामवंत बँकांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासन आणि वाहतूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेने केला आहे.
राज्यात अशा प्रकारचा घोटाळा पहिल्यांदाच समोर आला आहे. या प्रकरणात नामांकित बँकांच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने कारखाना प्रशासनाने ऊस वाहतुकदारांची फसवणूक केल्याचा आरोप संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे साखर उद्योगाशी संबधित सर्वच घटक चक्रावून गेले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती नेमकी किती मोठी आहे ? या घोटाळ्याला नेमके कोण जबाबदार आहे ? घोटाळ्याला जबाबदार लोकांवर काय कारवाई होणार ? याबाबत साखर कारखानदारांच्या संघटनांनी भूमिका स्पष्ट करून संभ्रम दूर करण्याची आवश्यकता आहे. कारण अशा प्रकारचे घोटाळे होत असतील तर त्याचा परिणाम आगामी काळात गाळप हंगामावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याप्रकरणी तातडीने साखर कारखान्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक शेती अधिकारी आणि बँक अधिकाऱ्यांवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी या संघटनेने येथील कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना निवेदन देण्यात आले आहे. मागण्याचा विचार न केल्यास आगामी गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.


















