कोल्हापूर: कोल्हापूर, सांगली आणि सातारा या प्रमुख ऊसपट्ट्यात पिकामध्ये लीफ वेबर माईट (जाळे करणारी कोळी) या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. उसाच्या जातीनुसार प्रादुर्भावाचे प्रमाण कमी अधिक दिसत आहे. हा सूक्ष्म कोळी पानांच्या खालच्या बाजूस जाळे तयार करून पानातून रस शोषतो. परिणामी, प्रकाशसंश्लेषणावर परिणाम होऊन उत्पादनात २० ते ३० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. लीफ वेबर माईटचा प्रादुर्भाव उष्ण व तुलनेने कोरड्या हवामानात अधिक वाढतो. तापमान वाढल्याने कोळीची वाढ, प्रजनन आणि जाळ्यांची निर्मिती वेगाने होते. मात्र पावसामुळे जाळ्या तुटून वसाहतींचे नुकसान होत असल्याने तिची संख्या कमी होते. त्यामुळे सलग उष्ण हवामान या किडीस पोषक ठरते, तर पाऊस तिच्या नैसर्गिक नियंत्रणास मदत करतो. याचबरोबर या कोळीवर उपजीविका करणारा स्कोलोथ्रिप्स ही उपयुक्त भक्षकही कोल्हापूर परिसरातील उसाच्या शेतांमध्ये आढळून आला आहे, असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अभयकुमार बागडे, संशोधक विद्यार्थी रवींद्र पालकर, शुभम पाटील यांनी सांगितले.
नर कोळी मागील बाजूस निमुळत्या आकाराचा, तर मादी कोळी अंडाकृती व मागील भाग गोल आकाराचा असतो. नराचा रंग फिकट पिवळसर ते हिरवट, तर मादीचा रंग फिकट हिरवा ते पिवळसर हिरवा असतो. प्रौढ अवस्था प्रामुख्याने पानांच्या खालच्या बाजूस तयार झालेल्या जाळ्यामध्ये आढळते. मादी कोळी पानांच्या खालच्या बाजूस जाळ्यामध्ये अंडी घालते. अंडी उबवण्याचा कालावधी ३ ते ४ दिवसांचा असतो. त्यानंतर आठवडाभरात दोन पिलावस्थांमधून तिची वाढ होते. वाढ पूर्ण झाल्यावर प्रौढ नर व मादी कोळी तयार होतात. प्रौढ १० ते १२ दिवस जगतो. कोळीचा संपूर्ण जीवनकाळ १८ ते २३ दिवसांत पूर्ण होतो. त्यामुळे अल्पावधीत अनेक पिढ्या तयार होऊन या कोळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. याचा प्रादुर्भाव पानाच्या शेंड्याकडील भागाकडे जास्त आढळतो. सतत रस शोषल्याने पाने निस्तेज, पिवळी व अशक्त होतात. तीव्र प्रादुर्भावात पाने तपकिरी पडून सुकतात. प्रकाशसंश्लेषणात अडथळा येऊन वाढ व उत्पादन घटते. खोडवा उसामध्ये प्रादुर्भाव नव्या लागवडीपेक्षा अधिक आढळतो. या किडीमुळे उसाच्या उत्पादनात २० ते ३० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


















