अहिल्यानगर : मुळा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी १७ संचाल बिनविरोध निवडून माजी मंत्री शंकरराव गडाख गटाने बाजी मारली आहे. विरोधकांना अवघ्या तीन जागांवर उमेदवार देण्यात यश मिळाले आहे. मात्र, साखर कारखाना निवडणुकीनंतर कर्जाच्या ओझ्याखाली आणि अडचणींना तोंड देत असलेल्या कारखान्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आव्हान साखर कारखान्यासमोर आहे. मुळा कारखाना निवडणूक जाहीर झाली, पहिल्याच विचारविनिमय बैठकीत माजी मंत्री गडाख यांनी आपली कैफियत मांडताना निर्माण केलेले वीज व इथेनॉल प्रकल्प व त्याबाबत शासनाकडून होत असलेला अन्याय सांगून अडचणीची कितीही आडकाठी आणली असली, तरी मार्ग निश्चित काढला जाईल, असा विश्वास देताना सहकार मोडीत काढण्याचे मनसुबे योग्य नसल्याचे सांगितले होते.
‘मुळा’सह राज्यातील अनेक कारखान्यावर संकटाची टांगती तलवार आहे. निवडणुकीत विरोधी गटाचे नेतृत्व करणारे आमदार विठ्ठल लंघे व उद्योजक प्रभाकर शिंदे यांनी प्रचाराचाच भाग म्हणून घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्जबाजारीविषयी कोलमडलेल्या आर्थिक गणिताचे कारण सांगताना कारखान्याचा वापर राजकीय उद्देशाने केल्याची टीका केली. सभासदांचे भागभांडवल थकीत दाखवून निवडणूक प्रक्रियेपासून अनेकांना मुद्दाम दूर ठेवल्याचा आरोप केला होता. मात्र गडाखांचा संघर्ष व त्याग ज्ञात असलेले अनेक सभासद व त्यांच्या परिवारातील सदस्य सभासद असल्याने निकालात याचे प्रतिबिंब उठणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे राहील. ‘मुळा’चे संस्थापक यशवंतराव गडाख यांच्या पुढाकारातून कारखाना निर्मिती व पुढे एज्युकेशन आणि विविध संस्था निर्माण झाल्याचा मुद्दा प्रचारात घेतला जात आहे.


















