मुंबई : चालू हंगामात भारताचे साखर उत्पादन ३०.९५ दशलक्ष टन राहील, असे सुरुवातीला अपेक्षित होते. मात्र आता ते सुमारे २७.९ दशलक्ष टनांवर येण्याची शक्यता असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात येत आहे. देशाचा वार्षिक साखर वापर सुमारे २८.५ दशलक्ष टन असल्याने उत्पादन आणि मागणी यामध्ये तफावत निर्माण होऊ शकते. यामुळे एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामाच्या प्रारंभी साखर कारखान्यांकडे केवळ ३.५ दशलक्ष टन साठा राहण्याचा अंदाज आहे.
हा साठा गेल्या तीन दशकांतील नीचांकी पातळीवरील साठा ठरू शकतो. तसेच सध्या देशातील इथेनॉलची वार्षिक मागणी १२ ते १३ अब्ज लिटर इतकी आहे. ती २०३९-४० पर्यंत सुमारे ३० अब्ज लिटरपर्यंत पोहोचू शकते, असा उद्योगाचा अंदाज आहे. तसेच देशातील इथेनॉलची मागणी आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. परिणामी एकेकाळी जगातील दुसरा सर्वांत मोठा साखर निर्यातदार भारताला पुढील किमान तीन हंगाम साखर निर्यात करणे अवघड जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना साखरनिर्यातीच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त केली. भारताकडे निर्यातीसाठी पुरेसा अतिरिक्त साखर साठा उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे आशिया, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील आयातदार देशांना साखरेचा तुटवडा जाणवू शकतो. परिणामी, आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर दर वधारण्याची शक्यता आहे. तर उत्पादनात मोठी घट झाल्यास भारताला पुढील काही वर्षांत साखर आयात करण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
जून महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा ४० टक्क्यांहून अधिक पावसाची तूट नोंदविली गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड पुढे ढकलली आहे. शेतकरी ऊस लागवड रद्द करून सोयाबीन पिकाची निवड करत असल्याचे चित्र आहे. ऊस रोपांच्या मागणीत मोठी घट झाली असल्याचे कृषी क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेतकरी कमी पाणी लागणाऱ्या पिकांकडे वळल्यास २०२७-२८ च्या हंगामात ऊस क्षेत्र आणि उपलब्धता दोन्हींत घट येऊ शकते असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले. तर ‘नॅचरल शुगर’चे व्यवस्थापकीय संचालक बी. बी. ठोंबरे यांच्या म्हणण्यानुसार, भविष्यातील सरकारी धोरणांचा कल साखर निर्यातीपेक्षा इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य देणारा राहू शकतो.


















