सांगली : येथील क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवड गुरुवारी (दि. २५) होणार आहे. अपेक्षेप्रमाणे कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ संचालक तुकाराम डवंग यांच्याकडे जाईल असे या आधीच जाहीर केले आहे. या निमित्ताने गेल्या वीस वर्षांत पहिल्यांदाच नायकवडी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला कारखान्याचे अध्यक्षपद मिळणार आहे. तरीही एकूण सत्ता आणि प्रशासनावर संचालक गौरव नायकवडी आणि नेते केदार नायकवडी यांचीच पकड राहणार आहे. गेल्या महिन्यात अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. कारखान्याचे वाळवा, नागठाणे आणि गोटखिंडी या गावात सर्वाधिक सभासद आहेत. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्षपद वाळव्याला तर उपाध्यक्षपद या दोन्ही पैकी एका गावात असे कारखाना स्थापनेपासून सूत्र आहे.
याआधी शामराव सव्वासे, तातोबा वाजे, ए. आर. चाऊस, श्रीमती निलावती माळी, महादेव कांबळे यांनी कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यानंतर पायंडा मोडून वैभव नायकवडी कारखान्याचे अध्यक्ष झाले होते. त्यांनी वीस वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळले. मात्र आधीच्या सामान्य घरातून आलेल्या अध्यक्षांच्या तुलनेत वैभव नायकवडी यांच्या कार्यकाळात कारखाना सर्वच आघाड्यांवर पिछाडीवर राहिला. त्यामुळे गेल्या महिन्यात नायकवडी कुटुंबातील किरण नायकवडी, गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांनी वैभव नायकवडी यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन ५१ दिवस या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या साखर शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले.या काळात वैभव नायकवडी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. सुरुवातीला आंदोलन बेदखल करून वैभव नायकवडी यांनी रोष ओढवून घेतला आणि नंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील यांच्या मध्यस्थीने त्यांनी राजीनामा दिला.
देशात सर्वांत कमी कार्यक्षेत्र असलेला एकमेव सहकारी साखर कारखाना…
देशात सर्वांत कमी म्हणजे पंधरा गावांचे कार्यक्षेत्र असलेला हा एकमेव सहकारी साखर कारखाना आहे. कार्यक्षेत्रात एकूण गाळपाच्या निम्मा ऊस उपलब्ध नसताना संस्थापक क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी सभासद आणि बिगर सभासदांच्या ताकदीने हा कारखाना आशिया खंडात नावारूपाला आणला होता. सुरुवातीच्या तीन अध्यक्षांना नागनाथअण्णा नायकवडी यांचे मार्गदर्शन होते. तर नंतरच्या दोन अध्यक्षांना दिवंगत नेते अरुण नायकवडी यांचे मार्गदर्शन होते. त्या काळात सलग अकरा वर्षे उच्चांकी साखर उताऱ्याचे राज्यात पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळवणारा हा एकमेव साखर कारखाना ठरला होता. पहिले बक्षीस सातत्याने एकाच साखर कारखान्याला जाते म्हणून शेवटी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने बक्षिसाचे निकष बदलले होते.

















