सांगली : हुतात्मा किसन अहिर कारखान्याच्या कामगारांना १५ टक्के बोनस; डेलीवेज कर्मचाऱ्यांना १३ हजार रुपये

सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने दिवाळीनिमित्त कामगारांना भरघोस बोनस जाहीर केला आहे. कारखान्यातील कायमस्वरूपी व हंगामी कामगारांना १५ टक्के, तर डेलीवेज (रोजंदारी) कामगारांना प्रत्येकी १३ हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. यासाठी एकूण १ कोटी ३५ लाख रुपयांची रक्कम कामगारांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा जयश्री अहिर व संचालक गौरव नायकवडी यांनी दिली.

यावेळी बोलताना अध्यक्षा जयश्री अहिर म्हणाल्या की, शेतकरी, कष्टकरी आणि कामगार यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी ग्रामीण भागात हुतात्मा कारखान्याची स्थापना केली. कारखान्याच्या स्थापनेपासूनच शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर देणे, कामगारांना वेळेवर वेतन अदा करणे आणि भरघोस बोनस देण्याची परंपरा कारखान्याने जपली आहे. त्यामुळे साखर उद्योगात कारखान्याने वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

संचालक गौरव नायकवडी म्हणाले की, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा यांनी राज्यातील साखर कामगारांसाठी तिसरे वेतन मंडळ शासनाकडून मंजूर करून घेतले आणि त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी हुतात्मा कारखान्यात केली. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या उसाला एफआरपीप्रमाणे दर देणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच कामगारांच्या श्रमाचा योग्य मोबदला देणेही आवश्यक आहे. कारखाना आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही व्यवस्थापनाने १५ टक्के बोनस जाहीर करून कामगारांची दिवाळी गोड केली आहे.

यावेळी उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, केदार नायकवडी, बापूसो पाटील, गंगाराम सूर्यवंशी, तुकाराम डवंग, विश्वास थोरात, रामचंद्र पाटील, तानाजी निकम, शरद थोरात, अरविंद कदम, संभाजी पाटील, शरद माळी, दिलीप पाटील, शिवाजी खामकर, लक्ष्मण शिंदे, शिवाजी जावीर, विलास पवार, विशाखा कदम, वैशाली मोहिते, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, सचिव मुकेश पवार, गोपाळ आरखडे, बाळकृष्ण मोहिते आणि संजय गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here