कोल्हापूर : आगामी हंगामात भोगावती सहकारी साखर कारखाना सहा लाख टन उसाचे गाळप करणार असून हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वच घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी केले. शाहूनगर, परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामातील मिल रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते.
गेल्या हंगामात कारखान्याने राज्यात उच्चांकी ऊस दर दिला असून सर्व बिले दिलेली आहेत. आगामी हंगाम हा महत्त्वाचा असून कारखान्याकडे ऊस कराराला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले. कारखान्याचे संचालक अमरसिंह पाटील यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष राजाराम कवडे, सर्व संचालक, माजी संचालक मारुतराव जाधव, ऊस तोडणी ओढणी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, कार्यकारी संचालक सागर पाटील, जनरल मॅनेजर संजय पाटील यांच्यासह सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















