धुळे : शिरपूर सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा येथील आर. सी. पटेल शाळेतील राजगोपाल भंडारी सभागृहात झाली. कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. काही सभासदांनी संचालक मंडळाला कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचा थेट आरोप केल्याने सभेत प्रचंड गदारोळ झाला. दरम्यान, सभासदांनी कारखान्याविषयी महत्त्वाची माहिती किंवा कागदपत्रे मागितली, तर ती प्रशासनाकडून मुद्दाम उपलब्ध करून दिली जात नाही,” असा आरोपही काही सभासदांनी केला. यावरून संचालक आणि सभासदांमध्ये काही काळ तीव्र खडाजंगी उडाली. सभेत कार्यकारी संचालक कमलाकर घुटे-पाटील यांच्या नियुक्तीस व स्वाक्षरीच्या अधिकारास मान्यता देण्यात आली. ‘दि मल्टी स्टेट को-ऑप सोसायटी अॅक्ट २००२’ नुसार पोटनियमातील दुरुस्तीला सभासदांनी मंजुरी दिली.
दरम्यान, नवीन सभासद करू नये, या मागणीचे निवेदन शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख हेमंत पाटील, मानव एकता पार्टीचे संस्थापक जितेंद्रसिंग जमादार, अॅड. गोपाल राजपूत आदींनी चेअरमन पाटील यांना दिले. सभेत ऊस लागवडीच्या नियोजनावरून आणि नोंदणीवरून सभासदांमध्येच दोन गट पडले. या मुद्द्यावरून सभासदांमध्ये आपापसात शाब्दिक चकमक उडाली. आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले की, कारखाना २०१९ मध्ये कोर्टाच्या निकालाने ताब्यात घेतला. जिल्हा बँकेचे १३४ कोटी रुपयांचे कर्ज बँक व नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने सेटलमेंट करून ३२ कोटींवर आणले व १०० कोटींची सूट मिळविली. व्याजदरही १७ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणला आहे. कारखान्याची निवडणूक लवकरच होणार असून त्यापूर्वी जास्तीत जास्त सभासद नोंदणी केली जाईल. यावेळी आमदार काशिराम पावरा, व्हाईस चेअरमन दिलीप पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवेंद्र पाटील, मार्केट कमिटीचे सभापती कांतीलाल पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, उपनगराध्यक्षा संगीता देवरे, संचालक राहुल रंधे, डी. पी. माळी आदी उपस्थित होते.


















