मुंबई : महाराष्ट्र सरकारने 2025-26 च्या गळीत हंगामातील थकीत एफआरपीप्रश्नी 81 साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तर 232.79 कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी सात साखर कारखान्यांविरोधात महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत सदस्य अरुण लाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. राज्यातील साखर उद्योगाची आर्थिक स्थिती आणि सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले की, ज्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी अदा केलेली नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 81 कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या असून सात कारखान्यांविरोधात थकीत रकमेच्या वसुलीसाठी आरआरसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील एफआरपी देयकांची एकूण स्थिती समाधानकारक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. चालू गळीत हंगामातील एकूण एफआरपीपैकी 98.33 टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आल्याचे ते म्हणाले.
विधान परिषदेतील चर्चेदरम्यान महाराष्ट्रातील साखर उद्योगावर वाढत असलेल्या आर्थिक दबावाचाही मुद्दा समोर आला. सहकारी साखर कारखान्यांनी तरलता (लिक्विडिटी) संकट आणि आर्थीक अडचणींवर मात करण्यासाठी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. साखर उद्योगाच्या दीर्घकालीन स्थैर्याबाबत उपस्थित झालेल्या चिंतेवर उत्तर देताना सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकारने हा विषय केंद्र सरकारकडेही मांडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली असून सहकारी साखर कारखान्यांसमोरील अडचणींचे सविस्तर सादरीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे साखरेच्या किमान विक्री मूल्यामध्ये (एमएसपी) वाढ करणे, थकीत एफआरपी देयकांसाठी सॉफ्ट लोन योजना सुरू करणे तसेच साखर कारखान्यांसाठी इथेनॉलचा दर आणि कोटा वाढविणे यांसारख्या उपाययोजनांचा विचार करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे हित जपत साखर उद्योगाची आर्थिक स्थिती अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारशी सातत्याने चर्चा सुरू असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना वेळेत देयके मिळावीत आणि साखर उद्योग दीर्घकालीनदृष्ट्या सक्षम व शाश्वत बनावा, हा राज्य सरकारचा उद्देश असल्याचेही सांगण्यात आले.


















