सांगली : येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना यांच्या अत्याधुनिक ऊस रोपवाटिकेत तयार करण्यात आलेल्या प्लास्टिक ट्रे मधील ऊस रोपांच्या विक्रीचा प्रारंभ उपाध्यक्ष जयप्रकाश साळुंखे यांच्या हस्ते झाला. संचालक जितेंद्र पाटील, अनिल पवार, दिलीप थोरबोले, अशोक विभुते, माजी संचालक संदीप पवार, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, सेक्रेटरी वीरेंद्र देशमुख, चिफ इंजिनिअर आशीष चव्हाण, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, कार्यालयीन अधीक्षक अविनाश लाड, संजय लाड, हणमंत जाधव, धनाजी गायकवाड, अमोल यादव, किरण लाड, विजय पाटील, सखाराम पवार, भरतकुमार लुपने, प्रेमानंद चव्हाण, धोंडिराम लाड, रावसाहेब पाटील तसेच परिसरातील शेतकरी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
साळुंखे म्हणाले, “टिपरीऐवजी रोप लावल्याने खात्रीशीर उगवण, सांधमोडीच्या त्रासातून मुक्तता, पाण्याची बचत आणि ऊस तोडणीसाठी सुमारे एक महिना अगोदरची तारीख मिळण्यासारखे फायदे होतात. कार्यक्षेत्रात दरवर्षी सुमारे ६० टक्के क्षेत्रावर रोप पद्धतीने ऊस लागवड केली जाते.” स्थापनेपासूनच ऊस रोपे तयार करून व्यावसायिक लागवडीसाठी तसेच सांधमोडीसाठी उधारीने पुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परिसरात सुमारे पाच एकर क्षेत्रांवर अत्याधुनिक रोपवाटिका कार्यरत आहे. ४२ कपांच्या प्लास्टिक ट्रेचा वापर, कोकोपीट व गांडूळ खताच्या साहाय्याने दर्जेदार रोपांची निर्मिती केली जाते. कारखान्याच्या ऊस रोपांना शेतकऱ्यांकडून प्रतिसाद आहे. गतवर्षी सुमारे ७० लाख ऊस रोपांची निर्मिती केली होती. एक कोटीहून अधिक रोपे तयार करून शेतकऱ्यांना पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. हर्षल पाटील यांनी आभार मानले.


















