सांगली : मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने आगामी २०२६-२७ च्या गळीत हंगामाच्या तयीरीला वेग आला आहे. कारखान्यात आयोजित विशेष कार्यक्रमात अध्यक्ष डॉ. मनोज शिंदे-म्हैशाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रसिद्ध उद्योजक गोविंदराव पाटील यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले. आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याने पाच लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी घोषणा अध्यक्ष डॉ. मनोज शिंदे यांनी केली.
या कार्यक्रमास आरग विकास सोसायटीचे अध्यक्ष सुरेश माळी, पंचायत समिती सदस्य विनोद गायकवाड, जयपाल कांबळे, कारखान्याचे संचालक पांडुरंग माने, सुरेश कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. शिंदे यांनी आगामी गळीत हंगामासाठी कारखान्यातील सर्व यंत्रसामग्री आणि मशिनरी दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर सुरू असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, कारखान्याकडून ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदारांचे करार करणे आणि त्यांना अॅडव्हान्स देण्याचे काम गतीने सुरू आहे. कारखान्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


















