नंदुरबार : बंद आदिवासी साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

नंदुरबार : बंद आदिवासी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आदिवासी टायगर सेनेसह डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सावरट गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी सुमारे एक तासाहून अधिक काळ रस्ता रोखून धरण्यात आला. डोकारे आदिवासी कारखाना हा द्वारकाधीश कारखान्याने भाडेपट्ट्यावर घेतलेला आहे. जोपर्यंत साखर कारखाना सुरू होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार दत्तात्रय जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.

गेल्या अनेक वर्षापासून कारखाना बंद असल्याने हजारो शेतकरी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असल्याने शासनाने हस्तक्षेप करत तातडीने कारखाना सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली. सकाळी करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली. कारखाना तातडीने सुरू करण्यात यावा, ही प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीमुळे कारखाना सील केला आहे. मात्र, आगामी ६ ते ८ दिवसांत बँकेचे अधिकारी, द्वारकाधीश साखर कारखान्याचे व्यवस्थापन यांच्यासोबत समन्वय बैठक घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले. या मुदतीत कारखाना सुरू करण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here