अहिल्यानगर : श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार मोनिका राजळे गटाने अपेक्षेप्रमाणे दोन्हीही जागांवर विजय मिळवला. तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांच्या अधिपत्याखाली मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणी केंद्रात राहुल राजळे, शिवशंकर राजळे व योगिता राजळे थांबून होते. कासार पिंपळगाव गटातील दोन जागांसाठी कारखान्याचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे, उद्धव वाघ व शिवशंकर राजळे असा तिरंगी सामना झाला. यात अप्पासाहेब राजळे यांना सर्वाधिक ४९३२, वाघ यांना ४१५८, तर शिवशंकर राजळे यांना १६४२ मते मिळाली, तर ६७ मते अवैध ठरवण्यात आली. कारखान्याच्या १९ जागांपैकी १७ जागा यापूर्वीच राजळे गटाने बिनविरोध निवडून आणल्या होत्या. त्यामुळे कारखान्याची एकहाती सत्ता त्यांच्या ताब्यात आली आहे. या निवडणुकीत उमेदवार शिवशंकर राजळे यांनी घेतलेली लक्षणीय मते चर्चेचा विषय ठरला.
निकालानंतर आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की, गेली चार टर्म कारखान्याची निवडणूक झाली नव्हती, यावेळीही ती व्हायला नको होती. मात्र, ती झाल्याने कारखान्याला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. निवडणुकीमुळे मात्र आम्हाला सर्व सभासदापर्यंत जाता आले व त्यांचे प्रश्नही समजावून घेता आले. भविष्यात सभासदांच्या अडचणी सोडवायला प्राधान्य देऊ. कारखाना उत्तमपणे चालवण्यास आमचे प्राधान्य राहिले आहे. तर निकालाबाबत शिवशंकर राजळे म्हणाले की, या लढाईत धनशक्ती विजयी झाली असली, तरीही मला पाचशेसुद्धा मते मिळणार नाही असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मतदारांनी चपराक देत सोळाशेहून अधिक मते मला दिली आहेत. या निवडणुकीत मला पाडण्यासाठी प्रचंड ताकद लावण्यात आली होती. दरम्यान, निवडून आलेले नूतन संचालक असे – अप्पासाहेब राजळे, उद्धव वाघ, सुभाष ताठे, अनिल फलके, श्रीकांत मिसाळ, नारायण काकडे, बाबासाहेब किलबिले, रामकिसन काकडे, सुभाष बुधवंत, यशवंतराव गवळी, सुरेश आठरे. शेषराव ढाकणे, बाळासाहेब गोल्हार. राहुल राजळे, काकासाहेब शिंदे, सिंधूबाई जायभाय, मोनिका राजळे, बापूसाहेब पाटेकर. संदीप लोखंडे.


















