कोल्हापूर : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना येथे आगामी हंगामासाठी मिल रोलर पूजन अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते झाले. सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून, आवश्यक सर्व तयारी केल्याची माहिती नरके यांनी दिली.
ते म्हणाले, संपलेल्या हंगामात कारखान्याने ४ लाख ८८ हजार ८७० टन उसाचे गाळप केले असून, त्यातून ६ लाख१५ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याचा साखर उतारा १२.५५ टक्के इतका राहिला असून, शेतकऱ्यांची एकूण १७४ कोटी ३ लाख ८० हजार रुपयांची संपूर्ण एफआरपी रक्कम खात्यावर वर्ग केली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कुंभी-कासारी कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. यावेळी उपाध्यक्ष सरदार पाटील, संचालक, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने आदी उपस्थित होते.

















