सांगली : क्रांती कारखाना यंदा करणार १२ लाख टन ऊस गाळप, ‘कार्बन कपात’ उपक्रमसुद्धा राबवणार

सांगली: येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामासाठी १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऊस उत्पादकांचे हित, वेळेत ऊसतोडणी आणि कार्यक्षम गाळपाला प्राधान्य देत हंगामाचे चोख नियोजन केले आहे. कारखान्याने गेल्या हंगामाच्या ११३ दिवसांत ९,५२,१८२.७३४ लाख टन गाळप केले. १२.६०१ साखर उतारा मिळवत नऊ लाख तीस हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. कारखान्याने एफआरपीपेक्षा जास्त, ३,५०० रुपये प्रति टन अंतिम दर दिला. आता चालू हंगामासाठी १५,०३०.४१ हेक्टर क्षेत्रावरील १६.५२ लाख टन ऊस उपलब्ध असून १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. कारखान्यासमोरील नैसर्गिक सर्व आव्हानांचा विचार करून आर्थिक नियोजन काटेकोर केले जाईल. प्रतिकूल परिस्थिती असली तरी शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड न करता त्यांना उसाचा योग्य व समाधानकारक मोबदला देण्यास प्राधान्य असेल, असे कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सांगितले.

कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी २१ हार्वेस्टर, ३३४ ट्रॅक्टर टोळी, १६०७ बैलगाडी व १०६ स्थानिक ट्रॅक्टर गाड्यांची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. १९.७० मेगावॉट क्ष मतेच्या सहवीज प्रकल्पातून ४ कोटी ३० लाख युनिट वीज निर्मिती व १२ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. डिस्टिलरी प्रकल्पातून १ कोटी ३० लाख लिटर इथेनॉल उत्पादन व ७५ कोटींचे उत्पन्नाचे ध्येय आहे अशी माहिती प्रशासनाने दिली. कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे यांनी सांगितले की, दुष्काळी स्थितीमुळे हंगाम कमी दिवस चालणार आहे. उत्पादन खर्च वाढणार आहे. शेतकऱ्यांसाठी ‘एफआरपी’, कामगार व बँक व्याज भागवण्यासाठी साखरेच्या ‘एमएसपी’ मध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक आहे. मार्गदर्शक अरुण लाड व अध्यक्ष शरद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक शिस्त आणि वेळेत ऊसदर देत कारखान्याची आर्थिक स्थिती अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here