साओ पाउलो : एल निनो ब्राझीलमधील 2026-27 च्या ऊस हंगामासाठी लाभदायक ठरू शकते. जगातील सर्वात मोठी साखर व्यापार कंपनी कोपरसुकर (Copersucar) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टोमस मंझानो यांच्या मते, एल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्टपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे ऊस पिकाच्या वाढीस चालना मिळू शकते.मात्र, मंझानो यांनी स्पष्ट केले की, ऊसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता असली तरी एल निनोचा परिणाम ऊस गाळप (क्रशिंग) आणि साखरेच्या निर्यातीसाठी (शिपमेंट) फारसा अनुकूल ठरणार नाही. प्रतिकूल हवामानामुळे कारखान्यांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, ज्याचा परिणाम उत्पादन प्रक्रिया आणि पुरवठा साखळीवर होण्याची शक्यता आहे.
जगातील सर्वात मोठी साखर व्यापार कंपनी असलेल्या कोपरसुकरने मंगळवारी जाहीर केलेल्या आर्थिक आकडेवारीनुसार, 2025-26 हंगामात कंपनीची साखर विक्री वार्षिक आधारावर सुमारे 9 टक्क्यांनी वाढून 1.70 कोटी टनांवर पोहोचली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, याच कालावधीत इथेनॉलची विक्री 10 टक्क्यांनी वाढून 21 अब्ज लिटर झाली. तसेच कंपनीचा एकूण महसूल मागील वर्षाच्या तुलनेत 5.5 टक्क्यांनी वाढून 65.8 अब्ज ब्राझिलियन रियाल (सुमारे 12.7 अब्ज अमेरिकन डॉलर) इतका झाला. टोमस मंझानो यांनी सांगितले की, आगामी काळातही कंपनीच्या विक्रीत सातत्याने वाढ होण्याची अपेक्षा आहे. यामागे कंपनीच्या प्रक्रिया व लॉजिस्टिक सुविधांचा विस्तार, ऊसाचे संभाव्य वाढलेले उत्पादन आणि जागतिक बाजारपेठेत साखरेची वाढती मागणी ही प्रमुख कारणे असतील.


















