धाराशिव : यावर्षी नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. कारखान्याच्या अधिकृत कार्यक्षेत्रामध्ये उसाची पीक परिस्थिती समाधानकारक आहे. मागील ऊस लागवड हंगामात कारखान्याकडे एकूण १४ हजार हेक्टर उसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्याने १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कार्यक्षेत्रात उपलब्ध असणारा ऊस पाहता, हे उद्दिष्ट सहजरीत्या पूर्ण होईल, असा विश्वास नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केला. कळंब तालुक्यातील रांजणी येथे कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन प्रसंगी ते बोलत होते. ठोंबरे यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले.
‘नॅचरल शुगर’ने आगामी गळीत हंगाम २०२६-२७ ची पूर्वतयारी वेगाने सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी मिल रोलर पूजन झाले. यावेळी संचालक, प्रवर्तक, एनसाई मल्टिस्टेट व श्री साई पतसंस्थेचे सर्व संचालक, विविध विभागांचे खातेप्रमुख, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. ठोंबरे म्हणाले की, आगामी हंगाम विनाअडथळा आणि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कारखान्यामध्ये यंत्रसामुग्रीची साफसफाई, आवश्यक दुरुस्ती व देखभालीची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालवला जाईल. यंत्रसामुग्री उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. नियोजित वेळेनुसार ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात गळीत हंगाम अधिकृतपणे सुरू होईल.


















