कोल्हापूर : ओलम शुगर्सचे उत्पादन वाढीसाठी पाऊल, शेतकऱ्यांना २५ टक्के अनुदानावर देणार २ कोटी ऊस रोपे

कोल्हापूर : ओलम शुगर्सने मागील गाळप हंगामात कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर विविध रोपवाटिकांच्या माध्यमातून एक कोटी ऊस रोपांचा पुरवठा केला होता. यंदा हे लक्ष्य दुप्पट करून दोन कोटी रोपे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार आहे, अशी माहिती ओलम शुगर्सचे मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. राजगोळी खुर्द येथील कारखान्याच्या मुख्य कार्यालयात ओलम शुगर्सशी करार केलेल्या विविध ऊस रोपवाटिका मालकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना २ कोटी दर्जेदार ऊस रोपांचा २५ टक्के अनुदान तत्त्वावर पुरवठा करणार असून, १५ ऊस रोपवाटिकांमधून गुणवत्तापूर्ण रोपे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

रोपवाटिकांशी करारप्रसंगी चंदगड, गडहिंग्लज, कागल, आजरा, शिरोळ, जयसिंगपूर तालुक्यांतील १५ ऊस रोपवाटिका मालक उपस्थित होते. आगामी हंगामात को-८६०३२, एमएस-१०००१, को-९२००५, को-व्हीएसआय-३१०२ आणि फुले-१३००७ या पाच ऊस जातींची दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्याबाबत रोपवाटिकाधारकांशी चर्चा करण्यात आली असल्याचे ऊस विकास अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले. कारखान्याच्या सर्व शेती कार्यालयांतून या रोपांचे वाटप होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी चंदगड विभागाचे ऊस विकास अधिकारी नामदेव पाटील, गडहिंग्लज विभागाचे रणजित सरदेसाई उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here