नांदेड : कासापुरी सर्कलमधील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून ऑर्गानिक गोदाकाठ साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिल मिळत नसल्याच्या निषेधार्थ बेमुदत उपोषण सुरू केले. कारखान्याने ऊस गाळप करूनही अनेक महिन्यांपासून थकीत ऊस बिल अदा केले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या हक्काची रक्कम व्याजासह तातडीने बँक खात्यात जमा करावी, अशी प्रमुख मागणी केली आहे. तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे.
गोदाकाठ ऑर्गानिक साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिले मिळावीत अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी ३० जून रोजी प्रशासनाला दिला होता. त्यानंतरही माागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. जोपर्यंत सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकीत ऊस बिल मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. कासापुरी सर्कलमधील व ऊस उत्पादक शेतकरी अनेक महिन्यांपासून थकीत ऊस बिलासाठी पाठपुरावा करताहेत. साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार पोलिसांकडे निवेदने, तक्रारी व अंतिम मुदत देऊनही देयके न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.


















