सांगली : एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी राजारामबापू पाटील साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शुद्ध व निरोगी रोपांचे वितरण सुरू केले असून या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कारखान्याचे संचालक अमरसिंह साळुंखे, सचिव डी. एम. पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील आणि सहाय्यक कृषी संशोधक विवेक पुजारी यांच्या उपस्थितीत वितरणाचा प्रारंभ झाला.
माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची परंपरा सुरू झाली असून अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात ती कायम ठेवण्यात आली आहे. यंदा २५ लाख रोपे वितरित करण्याचे उद्दिष्ट असून को-८६०३२ या वाणाच्या रोपांना विशेष मागणी आहे. प्रतिरोप २ रुपये १० पैसे दर असून २३ ते २५ दिवसांची रोपे आडसाली व पूर्वहंगामी लागवडीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. यावेळी सुहास पवार, प्रकाश मगदूम, ऋषिकेश रकटे आणि नीलेश पाटील उपस्थित होते.


















