सांगली : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांचे इंजिन खराब होते, असा केला जाणारा प्रचार दिशाभूल करणारा असून त्यामागे राजकारण असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे राज्यप्रमुख संजय कोले यांनी केला आहे. इथेनॉल मिश्रणामुळे देशाचे हजारो कोटी रुपयांचे परकीय चलन वाचत असून प्रदूषणातही मोठी घट होत आहे. त्यामुळे इथेनॉल मिश्रणाला विरोध न करता त्याबाबतचे गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोले म्हणाले, वाहनाच्या इंजिनात पाणी गेल्यास ते खराब होऊ शकते. मात्र ही समस्या केवळ इथेनॉलमुळे निर्माण होत नाही. पावसाळ्यात, वाहन धुताना किंवा पेट्रोल टाकीचे झाकण व्यवस्थित बंद नसल्यास टाकीत ओलावा किंवा पाणी जाऊ शकते. इथेनॉल हवेतील आर्द्रता शोषण्याचा गुणधर्म असला तरी त्यात पाणी असते, असा दावा चुकीचा आहे. वाहनधारकांनी टाकीचे झाकण योग्य प्रकारे बंद ठेवून वाहन शक्यतो निवाऱ्यात उभे केल्यास अशा तक्रारी टाळता येतात.
इथेनॉल निर्मितीसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होईल, असा प्रचारही दिशाभूल करणारा असल्याचे कोले यांनी सांगितले. पेट्रोल पंपांवरील इंधन टाक्यांची नियमित तपासणी केली जात असल्याने तेथील इंधनात पाण्याची समस्या उद्भवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इस्रायल-इराण संघर्षाच्या काळात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भारताचे आयातीत तेलावरील मोठे परावलंबित्व स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाची अंमलबजावणी देशासाठी दिलासादायक आहे इथेनॉलमुळे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच परकीय चलनाची बचत आणि पर्यावरणाचे संरक्षण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
इथेनॉलमुळे साखर उद्योगाला स्थैर्य…
संजय कोले म्हणाले, अतिरिक्त साखर उत्पादनामुळे ऊस व साखरेचे दर घसरण्याचा धोका इथेनॉल धोरणामुळे मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य मिळाले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा थेट फायदा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी नेते शरद जोशी यांनी अनेक वर्षांपूर्वी ब्राझीलच्या धर्तीवर ऊस व मळीपासून इथेनॉल निर्मिती करून पेट्रोलमध्ये त्याचा वापर करण्याची भूमिका मांडली होती. त्याच विचाराची अंमलबजावणी आज देशात होत आहे.


















