सातारा : श्रीराम साखर कारखान्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा रामराजे नाईक-निबाळकर यांचा इशारा

सातारा : श्रीराम सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अनंत मंगल कार्यालय, कोळकी येथे ऊस उत्पादक सभासद, शेतकरी आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या उपस्थितीत विशेष सभा झाली. आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे, माजी सभापती विश्वजितराजे नाईक निंबाळकर, ‘श्रीराम’चे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन भोसले व सर्व संचालक आदी उपस्थित होते. कारखाना वाचवण्यासाठी सभासद व सर्वसामान्य जनता त्यासाठी तयार असेल, तर आपण स्वतः तुमच्या सोबत रस्त्यावर उतरून या लढ्याचे नेतृत्व करण्यास तयार आहोत. मात्र, तुम्ही सर्वांनी ठाम निर्णय घेतला नाही, तर आपण यातून बाहेर पडू, असा इशारा आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी दिला.

आमदार रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले की, कारखाना आर्थिक गर्तेतून बाहेर काढून पुन्हा नव्याने उभा करण्यासाठी प्रत्येक सभासदाने आपला १५ हजार रुपयांचा शेअर पूर्ण केल्यास सुमारे १२ कोटी रुपयांचे शेअर भांडवल वाढेल. कारखान्याच्या नक्त मूल्यात वाढ झाल्यास कोणत्याही बँकेतून अर्थसाहाय्य घेऊन सभासदांच्या माध्यमातून हा कारखाना जोमाने चालविता येईल, त्यासाठी आगामी आठ दिवसांत सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. राजकीय गटबाजीमुळे कारखान्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण केले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
कारखान्याबाबत सुरू असलेले राजकारण अवाजवी असून, त्याला सत्तेची साथ मिळणे दुर्दैवी आहे असे ते म्हणाले. माजी आमदार दीपक चव्हाण यांनी कारखाना बंद पाडण्याचा डाव सभासदांच्या एकजुटीतून हाणून पाडावा, असे आवाहन केले. संचालक संतोष खटके यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद रणवरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सुखदेव बेलदार पाटील यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here