लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडण्यासाठी राज्यव्यापी ‘सामाजिक सुरक्षा जनजागृती व नोंदणी महाअभियान’ सुरू केले आहे. ही मोहीम 6 ते 11 जुलै दरम्यान राज्यातील सर्व सहकारी ऊस विकास समित्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत लाखो ऊस उत्पादक शेतकरी कुटुंबांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि अटल पेन्शन योजना (APY) यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडले जाणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक संरक्षण…
राज्य सरकारच्या मते, या योजनांमुळे अपघात, अकाली मृत्यू किंवा वृद्धापकाळात शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पन्न सुरक्षा वाढण्यास मदत होईल, जोखमीचे व्यवस्थापन मजबूत होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. सरकारचे उद्दिष्ट जास्तीत जास्त पात्र ऊस उत्पादक शेतकरी कुटुंबांची या योजनांमध्ये नोंदणी करून प्रत्येक कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित, स्वावलंबी आणि सक्षम बनविणे आहे. ही मोहीम ‘विकसित भारत’ आणि ‘विकसित उत्तर प्रदेश’ या संकल्पनांनाही बळ देणारी ठरणार आहे.
सहकारी ऊस विकास संस्थांची महत्त्वाची भूमिका…
या अभियानाच्या अंमलबजावणीत सहकारी ऊस विकास समित्या मध्यवर्ती भूमिका बजावणार आहेत. या संस्था शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे, पात्रता तपासणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आणि त्यांची तात्काळ नोंदणी करून घेणे यासाठी मदत करतील. सरकारच्या मते, या उपक्रमामुळे सहकारी संस्थांची भूमिका केवळ शेतीपुरती मर्यादित न राहता सामाजिक सुरक्षा योजनांच्या अंमलबजावणीतही अधिक प्रभावी होईल.
गावागावांत जनजागृती…
या अभियानादरम्यान प्रत्येक सहकारी ऊस विकास समितीत विशेष नोंदणी व सहाय्यता केंद्र उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांवर बँका, इफको (IFFCO), साखर कारखाने आणि इतर सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. शेतकऱ्यांना योजनांची माहिती, कागदपत्रांची पडताळणी, बँकिंग सुविधा आणि त्वरित नोंदणी अशा सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील. ग्रामीण महिलांचा सहभाग वाढावा यासाठी महिला बचत गटांनाही या अभियानात सक्रियपणे सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे महिलांचा आर्थिक निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढण्यास आणि कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता मजबूत होण्यास मदत होईल. याशिवाय ऊस पर्यवेक्षक, सहकारी संस्थांचे सचिव आणि विभागीय अधिकारी गावागावांत जाऊन शेतकऱ्यांना योजनांची माहिती देतील. ग्रामसभा आणि शेतकरी जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पात्र कुटुंबांची नोंदणी करण्यावर भर दिला जाणार आहे.


















