नांदेड : व्हीपीके उद्योग समूहाच्या तीन साखर कारखान्यांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमी बाजारपेठ मिळत असून, सुमारे साडेचार हजार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता समुहाच्यावतीने शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ऊस उत्पादनात वाढ करावी यासााठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत २८ शेतकऱ्यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित ‘ऊस शेती ज्ञानयज्ञ’ प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये ऊस लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर, रोग व कीड नियंत्रण तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. गेल्या सात वर्षांपासून विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांना एका वर्षात दोन वेळा आधुनिक ऊस शेतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचा फायदाही दिसून येत आहे.
व्हीपीके उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. यंदाच्या प्रशिक्षणात उमरी, धर्माबाद, नायगाव यांसह भोकर, बिलोली, हदगाव, हिमायतनगर, लोहा, मुखेड आणि कंधार तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले आहेत. यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ साधल्याचे उद्योग समूहाकडून सांगण्यात आले. व्हीपीके उद्योग समूह दुग्ध व्यवसायासारख्या पूरक उद्योगांना चालना देण्यासाठीही प्रयत्नशील आहे. साईकृपा दूध डेअरी, सिंधी यांच्या माध्यमातून गावागावांत दूध संकलन केंद्रे उभारून शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेऊन आधुनिक शेती व स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे आवाहन ऊस विकास अधिकारी सावंत एस.जे. यांनी केले.


















