कोल्हापूर : केवळ २०२१ ते २०२६ या कालावधीतील कामगारांच्या प्रॉव्हिडंड फंड व ग्रॅच्युईटीची २५ टक्के रक्कम आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने (गोडसाखर) दिली. याचा गाजावाजा मात्र फार मोठा करण्यात आला. २०१४ पासून २०२१ पर्यंत काम केलेल्या कामगारांना आयुष्यात केवळ मरणयातना भोगाव्या लागत असून, दरवर्षी मोळी टाकायला येणारे मंत्री कारखान्याच्या तोट्याची जबाबदारी मात्र घेत नाहीत. त्यांच्याच आदेशाने काम करणारे संचालक केवळ कामगारांची फसवणूक करीत असल्याचा आरोपही यावेळी ‘गोडसाखर’ सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनी केला.
यावेळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात व पत्रकार परिषदेत, कारखान्याच्या विविध गोष्टींवर आरोप करण्यात आले. यामध्ये, कामगारांना दिलेली ही रक्कम जिल्हा बँकेतून कर्ज काढून दिली असून, कारखान्याच्या नफ्यातून नव्हे. राहिलेली ७५ टक्के रक्कम कधी देणार? सेवानिवृत्त कामगारांची ३५ कोटी रुपयांची देणी देण्याबाबत अद्याप काहीच हालचाली नाहीत. कारखान्याच्या निवडणुकीवेळी एकहाती सत्ता द्या, २०० कोटी रुपयांचा चेक माझ्या खिशात आहे, अशी वल्गना करणाऱ्या नेत्यांनी एक हंगाम बंद पाडला, नंतरच्या हंगामात झालेले गाळप सर्वांना माहीत आहे व तत्कालीन अध्यक्षांनी कारखान्याच्या केलेल्या घोटाळ्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला. मात्र, त्यातही पुढे काहीच झाले नाही.
ब्रिस्क कंपनीने कारखान्यावर देण्याबाबत केलेला दावा कोणाच्या आशीवार्दाने सुरू आहे? गेल्या चार वर्षांत कारखान्यात ३० ते ३५ कोटी रुपयांच्या रकमेची योग्य पद्धतीने नियोजन न केल्यामुळे अडचणी वाढल्या असून, कारखाना जवळपास २५० कोटी रूपयांच्या कर्जात घालण्यामागचा उद्देश काय? या विभागातील कारखाने बंद पाडून स्वतःचा कारखाना उत्तम कसा चालेल, हे पाहिले जात असून, त्यांनी या कारखान्याचे उत्तरदायित्व स्वीकारून आता तरी सभासद व कामगारांना न्याय द्यावा, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेला आप्पासाहेब लोंढे, सुरेश पाटील, लक्ष्मण देवार्डे, सुभाष पाटील यांच्यासह अन्य कामगार उपस्थित होते.
















