कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याने (गोडसाखर) गतवर्षी गाळपाला आलेल्या उसाला प्रतिटन १०० रुपयांचा दुसरा हप्ता बँकेत जमा केला आहे. कारखान्याने गेल्यावर्षी १ लाख ९२ हजार ७४३ टन उसाचे गाळप केले होते. त्यापैकी शिल्लक प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे १ कोटी ९२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी बँकांशी संपर्क साधून उत्पादकांनी रक्कम उचल करावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी केले. दिवाळीनिमित्त नियमित कामगारांच्या बोनसची रक्कम ३१ ऑक्टोबरपूर्वी बँकेत जमा करणार आहे. त्यामुळे उत्पादकांसह कामगारांची दिवाळी गोड होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष पताडे यांनी सांगितले की, गेल्यावर्षी गाळप केलेल्या उसाला दुसरा हप्ता देण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती. त्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अध्यक्ष तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. त्याशिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी व कर्मचाऱ्यांचे नियमित पगार देण्याची कार्यवाही सुरू आहे. दिवाळीपूर्वी, ३१ ऑक्टोबरपर्यंत कारखान्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीची २५ टक्क्यांप्रमाणे दुसऱ्या हप्त्याची रक्कम १ कोटी ४६ लाख रुपये व नियमित कर्मचाऱ्यांना बोनसची १ कोटी ९ लाख रुपये, ऑक्टोबरचा पगार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. चालू गळीत हंगामाासाठी सभासद व बिगर सभासदांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले.


















