कोल्हापूर : साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात २० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून ते पूर्णत्वास नेण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी केले. कारखान्याच्या सन २०२६-२७ सालच्या ३४ व्या गाळप हंगामाकरिता मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते.
कारखाना कार्यस्थळावर चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले. ज्येष्ठ संचालक, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सर्व घटकांच्या सहकार्यामुळे येणाऱ्या हंगामात ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असा विश्वासही व्यक्त केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यावेळी संपूर्ण ऊस नोंद करून गाळपासाठी पाठवून कारखान्याच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, उत्तम आवाडे, दादासो सांगावे, संजयकुमार कोथळी, अभयकुमार काश्मिरे, सूरज बेडगे, गौतम इंगळे, प्रकाश पाटील, शीतल आमण्णावर, महेश पाटील, पार्श्वनाथ ऊर्फ सुनील नारे, प्रशांत कांबळे, सुभाष जाधव, वंदना कुंभोजे, कमल पाटील, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, सभासद महावीर मगदूम, पापा पाटील आदी उपस्थित होते.


















