धाराशिव : डॉ. आंबेडकर साखर कारखान्याच्यावतीने एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस प्लॉटवर शिवार फेरी, चर्चासत्र

धाराशिव : कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि व्हीएसआय पुणे यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस पिक उत्पादनावर भर दिला जात आहे. या अंतर्गत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुत्ता आणि पाडोळी येथे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ऊस पीक प्लॉट भेटी, शिवारफेरी व शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या शिवार फेरीसाठी कारखान्याचे सर्व संचालक आणि ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता व्यासपीठामुळे शेतकऱ्यांना कमी पाण्यात आणि कमी खर्चात जास्तीचे ऊस उत्पादन घेणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्याने ऊस शेतीत चांगला फायदा होत असल्याचा सूर शेतकऱ्यांमधून उमटला.

एआय कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे प्रकल्प समन्वयक डॉ. तुषार जाधव यांनी सांगितले की, एआयचा वापर करून ऊस शेतीत क्रांती घडविता येईल. डॉ. जाधव यांनी शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाचा वापर, उसाचे खत व्यवस्थापन, पाण्याचे अचूक नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, व्हीएसआय पुणे येथील कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ तुषार शितोळे यांनी उसावरील किडी, मित्र किडींची भूमिका आणि संभाव्य रोगराईचा प्रतिबंध कसा करावा, याचे तंत्र समजावून सांगितले. कारखान्याचे संचालक अॅड़. नीलेश बारखडे पाटील म्हणाले, की कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे हे वयाच्या ८५ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. सध्या प्रचलित झालेल्या या एआय आधारित ऊस पिक उत्पादनाच्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा लाभ परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here