कोल्हापूर : सध्या गूळ बनवण्यासाठी पुरेसा ऊस उपलब्ध नाही. त्यामुळे गुऱ्हाळ चालक ऊस रोपवाटिकेतील (नर्सरी) शिल्लक राहिलेले उसाचे तुकडे आणून त्याचा नाममात्र रस काढत आहेत. या रसामध्ये तब्बल ७५ ते ८० टक्के साखरेचे मिश्रण केले जात आहे. केवळ वीस ते पंचवीस टक्के उसाचा रस वापरून त्यात मोठ्या प्रमाणावर साखर मिसळली असल्याचे दैनिक ‘पुण्यनगरी’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. जिल्ह्यातील काही गुऱ्हाळघरांमध्ये सध्या उसाअभावी चक्क साखरेचा वापर करून भेसळयुक्त गूळ बनविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा भेसळयुक्त गुळामुळे कोल्हापूरच्या अस्सल, सेंद्रिय गुळाची ब्रँड व्हॅल्यू धोक्यात आली आहे. कमी खर्चात तयार होणारा हा भेसळयुक्त गूळ बाजारात स्वस्त दरात विकला जात असल्याने, प्रामाणिकपणे गूळ बनवणाऱ्या गुऱ्हाळमालकांना योग्य दर मिळत नसल्याचे वृत्तात म्हटले आहे.
जिल्ह्यातील काही गुऱ्हाळघरांत आणि सीमाभागातील अनेक गावांसह मोठ्या प्रमाणावर साखर आणून असा भेसळयुक्त गूळ बनवला जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी ‘अन्न व औषध प्रशासन’ विभागाकडे केली आहे. मात्र, दुर्दैवाने या विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवस हा भेसळयुक्त गुळाचा काळा बाजार बंद होता; मात्र आता पुन्हा एकदा हा व्यवसाय जोमाने सुरू आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारातील वाढती मागणी पाहून ग्राहकांच्या आरोग्याशी उघड उघड खेळ सुरू आहे. स्थानिक अशा भेसळयुक्त गुळाचा मोठा माहिती समोर आली आहे. गु-हाळांसोबतच शेजारच्या कर्नाटक राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर साखरमिश्रित गूळ कोल्हापूरच्या बाजारपेठेत दाखल होत आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनेक गोडावूनमध्ये सध्या साठा करून ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


















