कोल्हापूर : येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ-कोल्हापूर, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि स्कूल ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स अँड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साखर उद्योगातील उपपदार्थ व शाश्वतता’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा होते. यावेळी परिसंवादात डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जयकुमार पाटील, भोगावती कारखान्याचे एस. बी. चरापले, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, विशाल भास्कर आणि इथेनॉल उद्योजक अभिजित पाटील यांनी साखर उद्योगातील नव्या संधी, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.
कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजीत शिंदे म्हणाले की, साखर कारखानदारीचा समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणावर मोठा प्रभाव असून, हा उद्योग ग्रामीण विकासाचा कणा आहे. साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे मूल्यवर्धन अत्यावश्यक आहे. यावेळी डॉ. ए. एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कार्यशाळेच्या उद्दिष्टांची माहिती दिली. डॉ. अजित पाटील यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी माहिती दिली. डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. अभिजित पाटील, सागर जानराव यांनी कार्यशाळेच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. डॉ. रेणुका तुरुंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आसावरी यादव यांनी आभार मानले.


















