बेळगाव : राज्यात सध्या एकूण ८१ साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यातही बेळगाव जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक २९ साखर कारखाने कार्यरत आहेत. आता राज्य सरकारकडे मंजूर झालेल्या ४२ नव्या साखर कारखान्यांच्या प्रस्तावांपैकी तब्बल १३ प्रस्ताव हे एकट्या बेळगाव जिल्ह्यातील आहेत. या नव्या प्रस्तावांमुळे जिल्ह्याचे साखर उद्योगातील वर्चस्व आणखी मजबूत होण्याची चिन्हे आहेत. उसाचे विक्रमी उत्पादन, कृष्णा खोऱ्यातील सिंचन व्यवस्था, सहकारी व खासगी साखर उद्योगाची मजबूत परंपरा, इथेनॉल उत्पादन, को-जनरेशनद्वारे वीजनिर्मिती, निर्यातीची क्षमता आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असल्याने त्याचा मिळणारा फायदा या सर्व बाबी लक्षात घेता कर्नाटकातील साखर उद्योगाचे भवितव्य पुन्हा एकदा बेळगाव जिल्ह्याभोवती केंद्रित होताना दिसत आहे. यातून इथेनॉल, वीजनिर्मिती, वाहतूक, यंत्रसामग्री आणि पूरक उद्योगांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. यामुळे हजारो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही लाभ होईल.
सध्यस्थितीत बेळगाव हा सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा जिल्हा आहे. मुबलक ऊस उपलब्ध असल्याने कच्या मालाची कमतरता नाही. कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा खोरे तसेच हिडकल व नविलुतीर्थ सिंचनामुळे ऊस क्षेत्र स्थिर आहे. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे व सक्षम वाहतूक व्यवस्था आहे. इथेनॉल, डिस्टिलरी यांसह प्रशिक्षित मनुष्यबळ व औद्योगिक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. महाराष्ट्र सीमेलगत असल्याने अतिरिक्त उसाची सहज उपलब्धता होऊ शकते. या गोष्टींमुळे बेळगावला अधिक महत्त्व मिळू लागले आहे. नव्या १३ प्रस्तावांमध्ये यरगट्टी शुगर्स प्रा. लि., एम. चंदरगी (रामदुर्ग), श्रीदेवी शुगर्स लि., जालीकट्टी (रामदुर्ग), दानम्मादेवी शुगर्स, नंदीहाळ (रामदुर्ग), अंगडी शुगर्स अँड पॉवर लि., गोणिकोप्प (बैलहोंगल), अरिहंत शुगर इंडस्ट्रीज, हनबरहट्टी (बैलहोंगल), पद्मांब शुगर्स प्रा. लि., शिवनूर (कित्तूर), दानम्मादेवी शुगर्स, चुलकी (सौंदत्ती), विश्वराज शुगर इंडस्ट्रीज लि., नावगे (बेळगाव), सतीश शुगर्स लि., कौजलगी (गोकाक), सुप्रीम शुगर्स प्रा. लि., पंडेगाव (अथणी), बुटाली शुगर्स अँड केमिकल्स प्रा. लि., रामतीर्थ (अथणी), आदिनाथ शुगर्स लि., देवपूरहट्टी (रायबाग) आणि हलगा (ता. खानापूर) येथे खासगी संस्थेचा प्रस्ताव आहे. नव्या कारखान्यांमुळे उसासाठी स्पर्धा वाढणे, पाण्यावर ताण येणे आणि पर्यावरणीय परिणाम यांसारख्या आव्हानांचाही विचार करावा लागणार आहे.


















