कोल्हापूर : देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात (एक्स मिल गेट) साखरेच्या किमती (एक्स मिल) जून महिन्यात 3,800 रुपये प्रति क्विंटल होत्या. 16 जुलैपर्यंत या किमती वाढून 4,450 रुपये प्रति क्विंटल झाल्या आहेत. यातून साखर कारखान्यांच्या कमाईत भर पडली आहे. साखरेचे दर गगनाला भिडले असताना कारखानदारांकडून शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ का ? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘चीनी मंडी’शी बोलताना उपस्थित केला.
शेट्टी म्हणाले, गतवर्षीचा ऊस गळीत हंगाम संपून मोठा कालावधी उलटला, तरी अद्याप अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काचा दुसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यांत जमा केलेला नाही. सध्या नवीन हंगामाची पूर्वतयारी सुरू आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि मशागतीसाठी पैशांची आवश्यकता आहे. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी गत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने देण्याची गरज आहे. आता वाढलेल्या साखर दराचा फायदा शेतकऱ्यांनाही होणे गरजेचे आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.
राजू शेट्टी म्हणाले कि, केवळ साखरच नाही तर विविध उपपदार्थातून साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक कमाई होते. असे असताना अनेक कारखाने शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे दाम मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना केंद्र सरकार शून्य आयात शुल्कावर सुमारे 10 लाख टन साखर आयात करण्याचा विचार करू शकते, अशी माहिती उद्योग सूत्रांनी ‘चीनी मंडी’ला दिली. त्याचबरोबर बाजारातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार काही कठोर उपाययोजनांचाही विचार करत आहे. यामध्ये साप्ताहिक आणि पंधरवड्याच्या आधारावर साखर वितरण व्यवस्था लागू करणे तसेच व्यापाऱ्यांसाठी साखर साठवणुकीवर मर्यादा घालणे यांचा समावेश आहे.


















