सांगली : पावसाच्या विलंबाने आडसाली ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

सांगली : वारणा नदीकाठी प्रामुख्याने कोरेगाव, ढवळी, बागणी भागात आडसाली ऊस लावण मोठ्या प्रमाणात करण्यात येते. आडसाली ऊस लागण ही ऊस लागवडीची एक खास पद्धत आहे, जी १५ जुलै ते १५ ऑगस्ट यादरम्यान केली जाते. हे पीक जमिनीत १६ ते १८ महिने राहते. याला दोन पावसाळ्यांचा फायदा मिळतो, ज्यामुळे उसाचे उत्पादन इतर हंगामांच्या तुलनेत दीडपट जास्त मिळते. मात्र, बागणीसह परिसरात यावर्षी आडसालीचा टक्का घटत असल्याचे चित्र आहे. अनेकांनी आडसाली ऊस जाण्याच्या काळात एक सुरू हंगाम आणि एखादे तीन-साडेतीन महिन्याचे पीक घेता येते, म्हणून देखील आडसाली लागवडीला बगल दिली असल्याचे या शेतकऱ्यांतून सांगण्यात येते.

आडसाली ऊस लागवडीच्या काळात जमिनीचे योग्य तापमान, आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने हे हवामान उगवणीस अनुकूल असते. या हंगामातील उसाला दोन पावसाळे मिळत असल्याने मुख्य वाढीचा काळ जास्त राहून उसाची वाढ जोमदार होते. या हंगामातील लागवडीचे उत्पादन प्रतिहेक्टरी १५० टन मिळते. पण या हंगामासाठी ज्यादा कालावधी, खते, पाणी यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने या लागवडीखालील क्षेत्र मर्यादित ठेवण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. यावेळी पावसाने विलंबाने आगमन केले. यामुळे टंचाईचे सावट होते. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी आडसाली लावण करण्याचा बेत रहित करून सुरू लावणीचे नियोजन केले आहे. आता पावसाने दणदणीत हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आडसाली लावण उरकून घेऊ लागले आहेत. सध्या तरी भागात ऊस लावणीचा धडाका सुरू आहे. त्याचा परिणाम आडसाली ऊस लागवडीवर दिसून येईल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here