कोल्हापूर : अंकुश संघटनेच्या पुढाकाराने शिरोळ येथे आधुनिक रिकव्हरी तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेसाठी दानोळी येथे निधी संकलनासाठी बैठक झाली. येथील अंबाबाई मंदिरात निधी संकलन बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी तत्काळ १० हजार रुपयांची देणगी दिली. गावातील शेतकरी, व्यापारी आणि दानशूर व्यक्तींकडूनही या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही बबलू दळवी आणि धन्यकुमार भोसले यांनी दिली.
यावेळी संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे म्हणाले की, राज्यातील अशा प्रकारची ही पहिली त्रयस्थ व आदर्शवत प्रयोगशाळा ठरेल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची प्रत्यक्ष रिकव्हरी समजावी आणि साखर कारखान्यांकडून जाहीर होणाऱ्या रिकव्हरीमध्ये पारदर्शकता यावी, या उद्देशाने आंदोलन अंकुशतर्फे याची उभारणी केली जात आहे. या प्रकल्पासाठी तालुक्यातील गावागावांतून शेतकरी, व्यापारी आणि दानशूर व्यक्तींकडून लोकसहभागातून निधी उभारण्यात येणार आहे. येत्या गळीत हंगामापूर्वी प्रयोगशाळेचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाला शेतकऱ्यांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस बंटी माळी, उदय होगले, दत्तात्रय जगदाळे, बबलू दळवी, धन्यकुमार भोसले, विजय दळवी, रूपेश भोसले, प्रमोद बाबर आदी उपस्थित होते.


















