कोल्हापूर : जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील डोंगराळ भागात वन्यप्राण्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी मोठे संकट ठरत आहे. उन्हाळ्यात गवे व वानर, तर पावसाळ्यात रानडुकरांकडून शेतीपिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वारंवार होणारे नुकसान, अपुरी व विलंबाने मिळणारी नुकसानभरपाई आणि वनविभागाची उदासीनता यामुळे साहेब, आम्ही शेती करायची की नाही? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.
गेल्या आठवड्यापासून पन्हाळागडाच्या डोंगरकडील शिवारात रानडुकरांचा वावर वाढला असून, उसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मते, गव्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत रानडुक्कर पिकांवर तुटुन पडत आहेत. एकाच गटात एकदा भरपाई मिळाल्यानंतर त्याच क्षेत्रासाठी पुन्हा भरपाई नाकारली जात असल्याने अडचणी वाढल्या आहेत. वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होत नाहीत, भरपाई मिळण्यासही विलंब होतो. त्यामुळे नुकसानभरपाईपेक्षा वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
उत्पादन खर्च वाढत असताना वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे शेती परवडेनाशी झाली असून, अनेक शेतकरी शेती सोडण्याच्या मानसिकतेत पोहोचले आहेत. २५ एकर क्षेत्रातील पिकाचे नुकसान २५ एकर क्षेत्रातील ऊस पिकाचे रानडुकरांनी मोठे नुकसान केले आहे. उन्हाळ्यात गवे व वानर, तर पावसाळ्यात रानडुकरांच्या कळपामुळे वर्षभर नुकसान सुरूच असल्याने डोंगरकडील शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे.


















