सोलापूर : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामानिमित्त मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम भिलारवाडी येथील बागायतदार लक्ष्मण अंबोधरे, कारखान्याच्या मार्गदर्शिका रश्मी बागल आणि चेअरमन दिनेश भांडवलकर यांच्या हस्ते झाला. यंदाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालविण्यात येणार असल्याचे भांडवलकर यांनी सांगितले. त्यासाठी चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
प्रारंभी कारखान्याचे संस्थापक लोकनेते दिगंबरराव बागल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. कारखान्यामध्ये आगामी, सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाची तयारी म्हणून मशिनरीची दुरुस्ती व देखभालीची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी यावेळी दिली. तसेच ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणेचे करार करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्याची माहिती भांडवलकर यांनी दिली. यावेळी कारखान्याचे कामगार, कर्मचारी, अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, शेतकरी, सभासद उपस्थित होते.


















