कोल्हापूर : जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने ऊस लावणीचा वेग मंदावला असून त्याचा थेट फटका शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील ऊस रोपवाटिका व्यवसायाला बसला आहे. लावण खोळंबल्यामुळे ऊस रोपांची मागणी जवळपास ठप्प झाली आहे. सध्या रोपांचा पुरवठा अवघ्या ३० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे ऊस रोपवाटिका व्यवसायाला आर्थिक झळा बसत आहेत.
बहुतांश रोपवाटिकांमध्ये ४ ते ५ लाख ऊस रोपे विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांनी लावण पुढे ढकलल्याने रोपांची उचल होत नसल्याचे चित्र आहे. दरवर्षी जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात रोपांचा पुरवठा होत असतो. मात्र यंदा अनियमित पावसामुळे संपूर्ण नियोजन विस्कळीत झाले आहे. रोपवाटिका चालकांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन करून ठेवले असले तरी मागणी नसल्याने रोपे अडकून पडली आहेत.
येत्या १५ दिवसांत पावसाचा जोर वाढला नाही, तर रोपांची अतिरिक्त वाढ होऊन त्यांची गुणवत्ता व विक्रीक्षमता कमी होण्याची भीती रोपवाटिका चालकांना आहे. त्यामुळे आर्थिक गणितही बिघडण्याची चिन्हे आहेत. आगामी पंधरा दिवसांतील पावसावरच ऊस रोपवाटिका व्यवसायाचे भवितव्य अवलंबून असून शेतकऱ्यांसह रोपवाटिका चालकांचे लक्ष आता पावसाकडे लागले आहे.
ऊस रोपवाटिका चालकांना एक ऊस रोप तयार करण्यासाठी कच्चा माल, ऊस आणि मजुरी मिळून सुमारे १.५० रुपये खर्च येत आहे. वाहतूक खर्च धरल्यास हा खर्च २ रुपयांपर्यंत पोहोचतो. मात्र मागणी ठप्प झाल्याने सध्या अनेक ठिकाणी ऊस रोपांची विक्री अवघ्या १.५० रुपयांप्रमाणे होत आहे. यातून रोपवाटिका चालकांना ना नफा, ना खर्चाची भरपाई, अशीच अवस्था झाली आहे.
यंदा पुणे, इंदापूर रोपांना मागणी वाढली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर वाहतुकीवर निर्बंध आल्याने ऊस रोपांचा पुरवठा मंदावला आहे. पालखी मार्गावर वाहतुकीला मर्यादा आल्याने रोपवाटिका चालकांना वेळेत पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. रोपवाटिकांमध्ये ४ ते ५ लाख रोपे विक्रीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. सध्या मागणी ठप्प झाल्याने रोपवाटिका व्यवसाय तोट्यात करावा लागत आहे, असे काही रोपवाटिका व्यावसायीकानी सांगितले.


















