पुणे : येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपास आलेल्या उसाला यापूर्वी ३२७३ रुपये प्रतिटन एफआरपी ऊस उत्पादकांना अदा केलेली आहे. आता कारखान्याने खोडवा उसाला १०० रुपये प्रती मे. टनाप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गाळप केलेल्या १ लाख ८ हजार ७०२ मे.टनाची होणारी १ कोटी ८ लाख ४० हजार रुपये एवढी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी ही माहिती दिली. माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक, संचालक दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळाने याबाबतचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील म्हणाले की, गाळप हंगाम सन २०२५-२६ मध्ये खोडवा ऊसाकरीता प्रतिटन १०० रुपये अनुदानाची रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. त्यामुळे सभासद व ऊस उत्पादकांना ऊस लागवड व मशागतीस मदत होणार असून ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारखान्याने एफआरपीची रक्कम वेळेत दिलेलीच आहे. त्याशिवाय भीमाशंकर कारखान्याने आजपर्यंत सभासद, बिगर सभासद व गेटकेन अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. आता आगामी गाळप हंगाम २०२६-२७ साठी कार्यक्षेत्रातील व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


















