पुणे : यंदाचा ऊस गळीत हंगाम राज्यातील साखर कारखानदारांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या हंगामात ऊस उपलब्धतेत संभाव्य घट, ऊसतोड मजुरांची तीव्र टंचाई, साखरेच्या बाजारभावातील अनिश्चितता आणि एफआरपी, वाढता उत्पादन खर्च याचा साखर कारखान्यांवर वाढलेला आर्थिक ताण या परिस्थितीतून सर्वांना मार्गक्रमण करावे लागणार आहे. ऊस उपलब्धतेच्या संकटाबरोबरच ऊसतोड मजुरांची कमतरता हाही मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, त्यावर मात करण्यासाठी कारखाने हार्वेस्टरकडे वळत असून, शेतकऱ्यांनाही त्यानुसार लागवडीचे नियोजन करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे ऊस शेतीमध्ये बदल दिसून येत आहेत. सद्यस्थितीत साखरेच्या बाजारभावातील चढ-उतार, निर्यात धोरण, वाढता उत्पादनखर्च आणि एफआरपीनुसार देयके देण्याची जबाबदारी, यामुळे सहकारी साखर कारखाने जादा आर्थिक दबावाखाली आहेत.
राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांमध्ये गाडी सेंटर, डोके सेंटर आणि बैलगाडी सेंटर या पारंपरिक पद्धतींनी ऊसतोडणी केली जात असली, तरी सध्या मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक कारखाने हार्वेस्टरची संख्या वाढवत आहेत. हार्वेस्टरद्वारे सहज तोडणी होईल अशा पद्धतीने लागवड करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे. अनेक ऊसतोड टोळ्यांनी आगाऊ रक्कम घेऊन कामावर न परतल्याने अनेक कारखान्यांची मोठी रक्कम अडकली आहे. त्याचा परिणाम कारखानदारांवर झाला आहे. दुसरीकडे योग्य दर न मिळाल्याने आणि खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने ऊस उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडला आहे. आगामी गळीत हंगामात ऊस उपलब्धता, उसासाठीची स्पर्धा आणि उत्पादनखर्च हा ग्रामीण भागातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरणार असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी ऊस क्षेत्राचे अचूक नियोजन, पाण्याचा कार्यक्षम वापर, उत्पादकता वाढविणारे तंत्रज्ञान वापरण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


















