कोल्हापूर : नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभानिमित्त मिल रोलरपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. कारखान्याचे संचालक पोपट भोकरे व फिटर हंबीरराव माळी यांच्या हस्ते धार्मिक विधीनुसार मिल रोलरचे पूजन झाले. यावेळी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, युवा नेते आदित्य पाटील-यड्रावकर आदी उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले की, शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत शरद सहकारी साखर कारखान्याने आजवरचे सर्व गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडले आहेत. आगामी हंगामातही जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्याचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे. या वेळी जि. प. सदस्या प्राचिता कोळी, प्रवीण देसाई, प्रकाश पाटील-टाकवडेकर, दशरथ पिष्टे, अभिजित भंडारी, आप्पासाहेब चौगुले, लक्ष्मण चौगुले, रावसाहेब कुंभोजे, रावसाहेब चौगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. आवटी, नगरसेवक जवाहर पाटील उपस्थित होते. सुभाषसिंग रजपूत यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक एम. एम. पट्टणकुडे यांनी आभार मानले.


















