पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याचे विधायक पाऊल, दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासह वृक्ष लागवडीवर भर

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमांतर्गत रक्तदान शिबिर, अनुदान स्वरूपात आंबा, नारळ, पेरू, चिकू, लिंबू आणि जांभूळ या विविध फळझाडांचे वाटप तसेच अजितदादांना प्रिय असलेल्या सोनचाफा वृक्षाचे ‘अजितवृक्ष’ असे नामकरण करून त्याचे वृक्षारोपण करण्यात आले. कारखाना परिसरात प्रतीकात्मक स्वरूपात ५० अजितवृक्षांची लागवड करून अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. रक्तदान शिबिरात कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या शिबिरातून ३१९ रक्तपिशव्यांचे संकलन झाले.

कारखान्याच्यावतीने सभासद व बिगरसभासद शेतकऱ्यांसाठी १३ हजार फळझाडांच्या वाटपाला प्रारंभ करण्यात आला. कारखाना परिसरात ‘अजितवृक्ष’ अभियानाचाही प्रारंभ करण्यात आला. याबाबत कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, पर्यावरण संवर्धन, शाश्वत शेती आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीवर आधारित हे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. चालू वर्षी सुमारे २० हजार फळझाडांसाठी नोंदणी झाली असून यापैकी पहिल्या टप्प्यात १३ हजार फळझाडांचे वाटप सुरू केले आहे. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त सन २०१८ पासून फळझाड वाटपाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. आजपर्यंत कारखान्याच्या माध्यमातून सभासद आणि शेतकऱ्यांना तब्बल ९७ हजार फळझाडांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी उपाध्यक्ष किसन तांबे, संचालक राजवर्धन शिंदे, मिलिंद कांबळे, ऋषिकेश गायकवाड, प्रणिता खोमणे, लक्ष्मण गायकवाड, संग्राम सोरटे, आनंदकुमार होळकर, शैलेश रासकर, अनंत तांबे यांच्यासह सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सचिव कालिदास निकम उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here