पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी)वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी समृध्दी कर्ज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे ५० हजार हेक्टरवर ऊस उत्पादनवाढीसाठी कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून या तंत्रज्ञानाच्या वापरातून ऊस उत्पादन, उत्पादकतावाढीस पाठबळ देण्यासाठी १,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) यांसह अन्य संस्थांमार्फत या योजनेची अंमलबजावणी होईल. यास प्रती शेतकरी कमाल प्रतिहेक्टर ३० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. इतर खर्चात हवामान केंद्र, तांत्रिक साहाय्य, माती परीक्षणांतर्गत प्रती शेतकरी प्रतिवर्ष १० ते १२ हजार रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.
अध्यक्ष प्रा. डॉ. दुर्गाडे यांनी सांगितले की, एआय तंत्रज्ञान वापरतााना उसासाठी सूक्ष्म सिंचन प्रणाली आवश्यक आहे. या योजनेखाली शेतकरी सभासदाने घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परतफेड तीन ते पाच वार्षिक समान हप्त्यांत केली पाहिजे. कर्जावरील व्याजाचा दर विकास सोसायटीस वार्षिक १० टक्के असावा किंवा बँक धोरणात वेळोवेळी होणाऱ्या बदलाप्रमाणे राहील. उसामध्ये एआय तंत्रज्ञान वापरासाठी उचित फिल्टरसह फर्टिगेशनसाठी स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली आवश्यक आहे. एआय अंतर्गत व्यावसायिक किंवा मोठ्या शेतकऱ्यांना स्वतः करिता हवामान केंद्र, माती, पाणीमापक सेन्सर द्यावयाचे असल्यास त्यास हवामान केंद्रासाठी किमान १ लाख २५ हजार व ऊस पिकाचे प्रतिहेक्टर क्षेत्राकरिता सेन्सर बसविण्यासाठी (माती व ओलावा संवेदक) ३० हजार रुपये खर्च आहे. जिल्हा बँकेमार्फत सध्या २ लाख १० हजार सभासदांना १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे १ हजार ४०० कोटींचे पीक कर्ज बँक संलग्न संस्थांमार्फत केले जाते, असे सांगण्यात आले.


















