धाराशिव : लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. लोहारा (खुर्द) या साखर कारखान्यास ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरवठा केला होता, त्या शेतकऱ्यांची ऊसाची देयके लोकमंगल मल्टिस्टेट येथील त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती चेअरमन महेश देशमुख व संचालक प्रशांत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हंटले की, लोहारा (खुर्द) खेड येथील लोकमंगल माऊली या साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, कारखान्याने संपूर्ण ऊसबील १५ जानेवारीपर्यंत २ हजार ७०० रुपये प्रति टन व १६ जानेवारी ते गळीत हंगाम संपेपर्यंत २ हजार ८०० रुपये प्रति टन या प्रमाणे अदा केले आहे. तसेच तोडणी वाहतुकीचे बीलही अदा केल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे. या हंगामात कारखान्याने एकूण ६ लाख ६० हजार ६१९ मेट्रिक टन ऊस गाळप केला असून त्याचा साखर उतारा ९. ६२% आहे. याशिवाय, सहवीज निर्मिती विभागाने ८.१७ कोटी युनिट विजेची विक्री केली आहे.


















