धाराशिव: ह.भ.प. गणेश महाराज अंधारे यांनी बाणगंगा साखर कारखान्याच्या प्रलंबित थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावर पुकारलेले उपोषण मागे घेण्यात आले. अयान मल्टीट्रेड एलएलपीच्या लेखी आश्वासनानंतर हभप गणेश महाराज अंधारे यांनी उपोषण मागे घेतले. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून आणि या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्यासाठी अयान मल्टीट्रेड एलएलपी स्वतः मध्यस्थी करत पाठपुरावा करेल, असा विश्वास पत्राद्वारे देण्यात आल्याचे नमूद केले आहे.
ऊस उत्पादक शेतकरी तसेच ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदारांची बिले बाणगंगा कारखान्याकडे थकीत राहिली. वारंवार मागणी करूनही योग्य तोडगा निघत नसल्याने हभप गणेश महाराज-अंधारे यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग निवडला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण होते. याबाबत अयान मल्टीट्रेड एलएलपीने शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर कंपनीने देयके अदा करण्याबाबत दिलेले स्पष्ट लेखी आश्वासन आणि सकारात्मक भूमिकेनंतर हे आमरण उपोषण सोडण्यात आले. सर्व थकीत देयके ही ५ ऑगस्टपर्यंत पूर्णपणे अदा केली जातील, असा शब्दही कंपनीकडून देण्यात आला आहे.


















