अहिल्यानगर : जिल्ह्यात पारंपरिक कांडीऐवजी ऊस रोपांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल झपाट्याने वाढत आहे. परिणामी ऊस रोपवाटिकांमध्ये विविध वाणांच्या रोपांना मोठी मागणी वाढली असून, अनेक ठिकाणी रोपांची टंचाई जाणवू लागली आहे. परंपरागत कांडी लागवडीत उगवण कमी होते. याउलट रोपलागवडीत उगवण अधिक, वाढ एकसमान आणि वाढीचा कालावधी तुलनेने कमी असल्याचा अनुभव आहे. उत्पादनवाढ, रोगमुक्त ऊस आणि १०० टक्के उगवण या त्रिसूत्रीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर रोपलागवडीला प्राधान्य देऊ लागले आहेत.
दरम्यान, हवामानातील बदल आणि मजूर टंचाई यामुळे रोपे तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले आहेत. परिणामी अनेक रोपवाटिकांवर ताण निर्माण झाला आहे. विकसित झालेल्या वाणांच्या रोपांना विशेष मागणी आहे. दर्जेदार आणि रोगमुक्त रोपे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या लगबग सुरू आहे. दुसरीकडे प्रगतशील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रोप लागवडीमुळे ऊस उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होते. याविषयी ऊस उत्पादक शेतकरी संभाजी कदम म्हणाले की, ऊस कांडीपासून लागण केल्यास १०० टक्के उगवण होत नाही. तसेच वेळेत दर्जेदार ऊस कांडी बियाणे मिळत नाही. रोपांपासून हमखास उगवण चांगली होऊन उत्पादन अधिक मिळते. म्हणून ऊस लागणीसाठी रोपे वापरतो. चांगले उत्पादन मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी कांडीऐवजी तयार रोपांच्या माध्यमातून लागवड करण्यास प्राधान्य देत आहेत. अधिक साखर उतारा आणि चांगले उत्पादन देणाऱ्या नव्या वाणाांना प्राधान्य दिले जात आहे.


















