सोलापूर : धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याने शेतकऱ्यांच्या थकवलेल्या ऊस बिलापोटी पन्नास कोटीची रक्कम ३ हजार शेतकऱ्यांना वितरित केली आहे. हंगाम संपून चार महिने झाले तरी या कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले अदा केली नव्हती ही बिले त्वरित अदा करण्यात यावी, यासाठी धाराशिव, तुळजापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सलग वीस दिवस आंदोलन सुरू केले होते. २९ जूनपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील १५० हून अधिक उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने सुमारे ५० कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना गोकुळ शुगर संघर्ष समितीचे नेते अॅड. अमोल पाटील यांनी सांगितले की, संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे थकीत ऊसबिलांचे वितरण पूर्णत्वास गेले आहे. चालू हंगामातील ऊसबिले मिळाली असली तरी २०२४- २५ या हंगामातील थकीत बिलांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांसोबत लवकरच चर्चा करण्यात येणार असून, चालू बिलासोबतच जुनी थकबाकीही अदा झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले. संघर्ष समिती आणि आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याने थकीत ऊसबिलांचा प्रश्न मार्गी लागला आहे.


















