सातारा : बदलते हवामान व पाणीटंचाईचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने पीक नियोजन, हवामान अंदाज, रोगांचा पूर्व इशारा व उत्पादन खर्चात बचत शक्य असल्याने शेतकऱ्यांनी विज्ञानाधिष्ठित शेतीकडे वळावे, असे आवाहन बारामती कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी केले. रहिमतपूर येथील वीरशैव लिंगायत तिराळी मठात लोकनेते स्व. गुलाबराव माने भाऊ यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त आयोजित आधुनिक ऊस उत्पादन व प्रगत शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता या शेतकरी परिसंवादात ते बोलत होते.
डॉ. भोईटे यांनी माती परीक्षण, जलसंधारण, ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण तसेच एआय आधारित शेतीबाबत सखोल मार्गदर्शन केले. बारामती कृषी विज्ञान केंद्र गेल्या पाच वर्षांपासून ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट यांच्या सहकार्याने शेतीत एआय तंत्रज्ञान राबवत असून, याद्वारे उसाचे एकरी १५० ते २०० टन उत्पादन शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. संजय खांडे यांनी आभार मानले. यावेळी सह्याद्री कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल पाटील, वसंतदादा शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील माने, संभाजीराव गायकवाड, रमेश माने, पं.स. उपसभापती रवींद्र पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


















