सोलापूर : बीबीदारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात २ लाख ३५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख यांनी दिली. मागील वर्षी साखर कारखान्याने केलेल्या ऊस गाळपाचा उतारा ९.७५ टक्के एवढा पडला आहे. त्या अनुषंगाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे बिल दिले आहे. कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन २८०० रुपयांप्रमाणे संपूर्ण उसाचे बिल त्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली. यंदा पाऊस कमी आहे. त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाणी टंचाई लक्षात घेऊन उसाला ठिबकद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न करावा. त्यातून पाण्याचे योग्य नियोजन करावे. सध्या ऊस तोडणी करार कारखान्याच्या कार्यालयामध्ये सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
चेअरमन देशमुख म्हणाले, साखर कारखान्याच्यावतीने पुढील गाळप हंगामात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल. उपग्रह प्रणालीचा वापर करून उसाची परिपक्वता आधारित तोडणी कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यामुळे साखर उतारा वाढण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा योग्य भाव मिळेल. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपल्या उसाच्या नोंदी केलेल्या नाहीत, त्यांनी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडे उसाच्या नोंदी कराव्यात. त्याचबरोबर त्यांनी आपला ऊस साखर कारखान्याला घालावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


















