छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या साखर उद्योगात आता यांत्रिकीकरणाचा वेगाने विस्तार होत आहे. पारंपरिक कोयत्याच्या जागी आता आधुनिक शुगरकेन हार्वेस्टर आणि हायड्रॉलिक कटर्सचा वापर वाढला असून, कधीकाळी लाखो ऊसतोड मजुरांच्या श्रमांवर चालणारा गळीत हंगाम आता मोठ्या प्रमाणात यंत्रांवर अवलंबून झाला आहे. दैनिक ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हंगामाच्या काळात ऊसतोडणी यंत्रे दिवस-रात्र अशा दोन शिफ्टमध्ये कार्यरत असतात. एका हार्वेस्टरसाठी ऑपरेटर, चालक आणि हेल्पर यांच्यासह सुमारे 10 जणांची टीम काम करते. त्यामुळे पारंपरिक ऊसतोड मजुरांच्या रोजगारात घट झाली असली, तरी यांत्रिक कौशल्यावर आधारित नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
राज्यातील गळीत हंगाम साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च या पाच महिन्यांच्या कालावधीत असतो. उर्वरित सात महिने बहुतांश यंत्रे बंद राहतात. त्यामुळे वर्षभराच्या कर्जाचे हप्ते आणि देखभालीचा खर्च या पाच महिन्यांच्या उत्पन्नातूनच भागवावा लागतो. सध्याच्या ऊस लागवडीच्या क्षेत्राचा विचार करता, राज्यासाठी सुमारे 3,000 हार्वेस्टर पुरेसे असल्याचे मानले जात आहे.मागील हंगामात राज्यात सुमारे 500 नवीन हार्वेस्टर यंत्रांची खरेदी झाली होती. मात्र, यंदा परिस्थिती काहीशी बदललेली दिसत आहे. एल निनोच्या प्रभावामुळे कमी झालेल्या पावसामुळे नव्या यंत्रांच्या खरेदीचा वेग मंदावला असून, यावर्षी 100 ते 150 हार्वेस्टर खरेदी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही साखर कारखाने स्वतः यंत्रे खरेदी करत असून, काही कारखाने सभासदांना हार्वेस्टर खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा देत आहेत.
आज हार्वेस्टर हे केवळ शेतीतील यांत्रिक साधन राहिले नसून, अनेक ग्रामीण युवकांसाठी ते ‘चालती-बोलती कंपनी’ ठरत आहे. कोणताही अडथळा नसल्यास एक हार्वेस्टर दररोज सुमारे 150 टन ऊसाची तोडणी करू शकते. पूर्वी ज्या कामासाठी 100 ऊसतोड मजुरांचा ताफा आवश्यक होता, तेच काम आता हे यंत्र काही तासांत पूर्ण करते.यांत्रिकीकरणामुळे ऊसतोड मजुरांचे मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर कमी झाले असून, मुकादमांकडून होणाऱ्या त्रासालाही आळा बसल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, मजुरांच्या टंचाईमुळे अडचणीत आलेल्या साखर कारखानदारांनाही हार्वेस्टरमुळे मोठा दिलासा मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगात ऊसतोडणी यंत्रांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.


















